Essay on Mahatma Gandhi in Marathi in Marathi: राष्ट्रपिता महात्मा गांधी हे माझे आवडते पुढारी आहेत. सत्याग्रह व असहकार या जगावेगळ्या अहिंसक शस्त्रांनी त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. बापूजी ‘महात्मा’ कसे झाले, याचा शोध घेतला की, त्यांच्या चरित्रातील दिव्यत्व प्रत्ययास येते.
आपली जीवनकहाणी सांगताना बापूजी तिचा उल्लेख ‘सत्याचे प्रयोग’ म्हणून करतात. त्यांनी आपल्या या चरित्रात जीवनातील सर्व चुकांची त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली आहे. गांधीजींनी लोकांना सत्याचे नुसते पाठ दिले नाहीत, तर स्वतःच्या वनात सत्याचे प्रयोग प्रत्यक्ष करून दाखवले.
महात्माजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. बापूजींनी आयुष्यभर सत्य, अहिंसा या व्रतांचे कठोरपणे पालन केले; बापूजीजवळ असामान्य धाडस होते. आपल्या देशातील लोकांची विपन्नावस्था पाहून बापूजी केवळ पंचा नेसूनच सर्वत्र वावरू लागले.
सशस्त्र सरकारला त्यांनी आव्हान दिले ते नि:शस्त्र हातांनी. ‘सत्याग्रह’ या नवीन अस्त्राचा उपयोग त्यांनी प्रथम आफ्रिकेत आणि नंतर भारतात केला. १९२० ची बापूजींची असहकार चळवळ, १९३० ची ‘दांडी यात्रा’ व १९४२ चा ‘चले जाव’ लढा- हे साऱ्या विश्वातील स्वातंत्र्यआंदोलनांमधील सोनेरी क्षण होते.
बापूजींच्या मोठेपणाचे रहस्य त्यांच्या निष्कलंक चारित्र्यात होते. बापूर्जीजवळ विलक्षण ‘संयम’ होता. आजच्या विदयार्थ्यांत कोणत्याही तहेचा ‘मनोनिग्रह’ आढळत नाही. मनोनिग्रहाचे महत्त्व त्यांना बापूजींच्या जीवनचरित्रातून कळून येईल. एकदा डॉक्टरांनी कस्तुरबांना आजारपणात मीठ सोडायला सांगितले होते; परंतु त्या तयार नव्हत्या. तेव्हा बापूजींनी त्यांचे मनोबल तयार करण्यासाठी स्वत:च मीठ सोडले. अखेरपर्यंत त्यांचे भोजन म्हणजे खजूर व शेळीचे दूध हे साधे पदार्थ होते.
सत्ता, संपत्ती यांच्या जीवघेण्या स्पर्धेत बापूजी केव्हाच अडकले नाहीत. आफ्रिका सोडताना त्यांना मिळालेल्या सर्व भेटी त्यांनी देशकार्यासाठी अर्पण केल्या. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेच्या कोणत्याही पदाची हाव न धरता, ते निर्वासितांच्या सेवेला धावून गेले. सामान्याकडून असामान्यत्वाकडे यशस्वी वाटचाल कशी करता येते, याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे राष्ट्रपिता बापूजी! प्रख्यात तत्त्वज्ञ आईनस्टाईनने महात्माजींविषयी असे म्हटले आहे की, “आणखी काही वर्षांनंतर असा एक मनुष्य झाला होता, यावर कोणी विश्वास ठेवणार नाही.”