Essay on My Favourite Hobby in Marathi: कुणाला छंद असतो गाण्याचा, तर कुणाला गडकिल्ले हिंडण्याचा; तर कुणाला पोस्टाची तिकिटे, जुनी नाणी किंवा विविध जुन्या दुर्मीळ वस्तू जमवण्याचा. काहीजण एकांतात सतार छेडत बसतात. कुणी पुस्तकांना आपले मित्र मानतात, तर कुणी कागदावर कुंचल्यांनी चित्र रेखाटण्याचा आनंद लुटतात. माझा छंद मात्र जरा मुलखावेगळाच आहे. लहानपणापासून मला आवड आहे ती, माणसे जोडण्याची आणि जसजसा मी मोठा होत गेलो, तसतशी माझी ही आवड सतत वाढतच गेली.
माझ्या लहानपणापासून मला आपल्या घरी खूप माणसे यावीत, घरात वर्दळ वाढावी. गडबड उडावी असे खूप खूप वाटे. सुट्टीचा वार रविवार आणि सुट्टीचा ‘मे’ महिना मला अत्यंत प्रिय आहे. कारण सुट्टीमध्ये खूप पाहुणे घरी येतात. उन्हाळ्याची सुट्टी येण्यापूर्वीच मी माझ्या आप्तांना, मित्रांना आमंत्रणे पाठवतो. त्यांना वाटते की, किती प्रेमळ, लाघवी मुलगा आहे. पण माझे माणूसवेडाचे रहस्य त्यांना अज्ञात असते.
मला कोणतीही माणसे आवडतात. आम्ही जेव्हा कॉलनीत राहायला आलो, तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो; मोकळा वेळ भरपूर असे. तेथे बांधकाम करणाऱ्या माणसांशी मी दोस्ती करत असे. बांधकामावर खूप स्त्रिया असत आणि त्यांच्याबरोबर त्यांची लहान मुलेही असत. त्या मुलांबरोबर मी खूप खेळत असे. त्यांच्याकडून मी विटीदांडूचा खेळ शिकलो. ही मुले लहान वयातच आपल्या आईवडिलांना केवढी मदत करतात ! आज ती मुले मोठी होऊन स्वतंत्रपणे कामे करू लागली आहेत.
माझा हा छंद सतत वाढतच गेला. वर्गातील दोस्तच काय, पण शाळेतील इतर वर्गातील अनेक मुलांशी माझी मैत्री जमली. मला बोलायला खूप आवडते, पण तितकेच मला इतरांचे विचारही ऐकायला आवडतात. त्यामुळे माझा दूरचा प्रवासही कधी कंटाळवाणा होत नाही. प्रवासात अनेक ओळखी होतात, अनेक अनुभव ऐकायला मिळतात. अनेकांशी मैत्रीचे संबंध निर्माण होतात. गाडीत माल विकणाऱ्या फेरीवाल्याबरोबरही गप्पा मारायला मला आवडते. मी माझ्या अनुभवांतून मित्र जोडण्याचे व मैत्री टिकवण्याचे एक शास्त्र तयार केले आहे. मी जोडलेली असंख्य माणसे, मित्रमंडळी सदैव माझ्याभोवती असतात – कधी प्रत्यक्ष, कधी पत्ररूपाने तर कधी छायाचित्रांच्या स्वरूपात !
माझ्या या मित्रांसाठी मला वेळ द्यावा लागतो. अगदी परीक्षेच्या दिवसांतही एखादयासाठी माझा वेळ खर्चावा लागतो. पण त्यात मला आगळा आनंद मिळतो. माझे सुख सर्वस्व या छंदात सामावलेले आहे. ‘छंद माझा वेगळा, आनंद माझा आगळा’ हेच खरे!