Essay on My Neighbour in Marathi: एकविसाव्या शतकातील या ऐश्वर्यसंपन्न महामुंबईला अजिबात न शोभणारी आमची ही ‘शांताराम चाळ’ आता थोड्याच दिवसांची साथीदार आहे. वीस-पंचवीस मजली भव्य इमारतींच्या गर्दीत उच्चभ्रू लोकांना अशी चाळ फार विसंगत दिसते. ऐंशी वर्षांच्या प्रवासात ती आता अगदी जराजर्जर आणि खिळखिळी झाली आहे. पण येथे राहणाऱ्या साध्या, सामान्य लोकांच्या मनात तिच्याबाबत अनेक कडू-गोड आठवणींचा कल्लोळ आहे. चाळ नाहीशी होणार; पण तिच्याबरोबर आपण आणि आपले हे प्रेमळ शेजारी पांगणार ही बोचक जाणीव आम्हा सर्वांना व्यथित करत आहे.
विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात ही चाळ बांधली गेली, तेव्हा तिचा रुबाब केवढा होता! आज येथे राहणारे काहीजण सुरुवातीपासून येथे आहेत. त्यांची तिसरी पिढी आता या चाळीच्या गॅलरीत खेळत आहे. काहीजण कारणपरत्वे चाळ सोडून गेले. कुणी ब्लॉकमध्ये राहायला गेले, तर कुणी उपनगरात स्वत:च्या बंगल्यात गेले. पण चाळ सोडून गेलेले हे आमचे शेजारी अजून अधूनमधून येतात, जुन्या आठवणी काढतात आणि काही काळ सुखावतात.
आज आमच्या शेजाऱ्यांत विविध जाति-धर्मांचे व पंथांचे लोक आहेत. आमच्या शेजारचा जॉन न चुकता दर रविवारी चर्चमध्ये जातो. अब्दुलच्या घरातील वडीलमाणसे दिवसातून पाच वेळा नमाज पढतात. दर सुट्टीत केरळला जाणारा बालन सर्वांसाठी केळ्यांचे वेफर्स घेऊन येतो आणि मालवणला जाऊन येणारे मालवणकरकाका सर्वांसाठी केरसुण्या, सुपे, फणसाचे गरे घेऊन येतात. आम्ही सर्वजण एकाच कनिष्ठ मध्यम वर्गातील आहोत. सर्वांच्या अडीअडचणी सारख्याच आणि अशा वेळी एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्तीही सारखीच.
गेल्या वर्षी रमणिकभाईंना हृदयविकाराचा झटका आला. रातोरात त्यांना रुग्णालयात नेऊन पुढील उपचार करावे लागले. पंधरा मिनिटांत आवश्यक रक्कम जमली. रमणिक- भाईंनीही घरी आल्यावर महिन्याभरात सर्वांचे पैसे फेडून टाकले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू होते. तमिळ भाषक परमेश्वर आणि राधा यांचा सुपुत्र मणी बारावीच्या परीक्षेत बोर्डात पहिला आला, तेव्हा त्याच्या यशाने सारी चाळ आनंदली. चाळीवर विद्युत रोषणाई केली गेली.
आमच्या या चाळीत सर्व धर्मांचे सण मोठ्या आनंदाने साजरे होतात. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी असे राष्ट्रीय सण तर आम्ही एकत्र येऊनच साजरे करतो. त्या दिवशी मोठ्या उत्साहात सहभोजन पार पडते. अशी आमची ही चाळ राष्ट्रीय एकात्मतेचे छोटे प्रतीकच आहे.
आता मात्र थोड्याच दिवसांत हे सारे संपणार आहे. कारण महानगरपालिकेनेच आमची चाळ धोकादायक म्हणून जाहीर केली आहे. ती पाडली जाणार म्हणजे आमचे हे शेजारी एकमेकांच्या प्रेमळ शेजाराला सुकणार. पण या गोड स्मृती मात्र ते केव्हाही विसरणार नाहीत, हे नक्की!