Essay on Autobiography of Wounded Soldier in Marathi: भारताला उद्ध्वस्त करण्याचे सातत्याने प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानने विश्वासघाताने कारगीलमध्ये घुसखोरी केल्यावर देशभर संतापाची लाट उसळली. पाकिस्तानला हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात अनेक जवान जखमी झाले; तर शेकडो जवानांना प्राण गमवावे लागले. यामुळे देशात क्रोधाग्नी भडकला. ‘पाकिस्तानला कायमचे नेस्तनाबूत करा,’ असे आमचेही मन ओरडून सांगत होते. असा कल्लोळ मनात उसळला असताना बातमी आली- आमच्यापासून जवळच असलेल्या हॉस्पिटलमध्ये कारगीलमध्ये जखमी झालेले मेजर जयंत राय यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आम्ही काही मित्रांनी तत्काळ हॉस्पिटलकडे धाव घेतली. आम्हांला त्यांना भेटायचे होते; त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची होती. तेथे आम्हांला मेजर जयंत राय भेटले. त्यांचे दोन्ही हातपाय प्लॅस्टरने जखडलेले, डोक्यालाही बॅण्डेज होते; पण गडी खचलेला नव्हता. मोठ्या उत्साहाने बोलत होते ते-
मित्रांनो, कारगील युद्ध ही केवळ आमची फसवणूक होती. भारत-पाकिस्तानमध्ये मैत्रीची बोलणी चालू असताना पाकिस्तानने विश्वासघाताने हल्ला केला. आम्ही प्राण पणाला लावून विजय मिळवला.
मी जखमी झालो होतो तरी लढत होतो. ‘जिंकू किंवा मरू’ हाच माझा बाणा होता. त्या क्षणीही मला आठवण झाली ती श्रीशिवरायांची, नेताजी सुभाष बोसांची. मातृभूमीचे रक्षण हेच ध्येय डोळ्यांसमोर होते. आजही हेच ध्येय आहे. म्हणून लवकर बरे होऊन मला पुन्हा रणभूमीत जायचे आहे आणि शत्रूला पूर्णपणे नामोहरम करायचे आहे. पण मेजरसाहेब तुम्हा जवानांना नेहमी घरापासून दूर राहावं लागतं, याचं आम्हांला वाईट वाटतं,” मी म्हणालो.
पण आम्हांला वाईट वाटत नाही. कारण आम्हांला माहीत आहे की, सारा देश आमच्यामागे खंबीरपणे उभा आहे. प्रत्येक सणाला, राष्ट्रीय दिनाला आम्हांला देशाच्या कोनाकोपऱ्यांतून शुभेच्छा पत्रे येतात, भेटी येतात, थंडीच्या दिवसांत आमच्या देशभगिनी स्वतः स्वेटर विणून पाठवतात. अशा या प्रेमळ भेटींमुळे लढण्याला दुप्पट बळ येते.
मित्रांनो, मी जेव्हा सैन्यात दाखल झालो तेव्हाच मला माहीत होते की, सैन्यातील नोकरी हे ‘सतीचे वाण’ आहे. सैन्यात दाखल होणाऱ्या प्रत्येकाने ते स्वीकारलेले असते. कारण रणांगणावर येणारे मरण सैनिकाला अमर बनवते.
मित्रांनो, मला तुम्हांला एवढेच सांगायचे आहे की तुम्ही पुढे कोणत्याही क्षेत्रात काम करा. कुठेही असा, पण देशाला विसरू नका.” मेजर जयंतांचे विचार ऐकून आम्ही भारावून गेलो. त्यांना तसे आश्वासन देऊन आम्ही त्यांचा निरोप घेतला.