“शाळेचा निरोप घेताना” निबंध मराठी मध्ये Essay on School Farewell in Marathi

Shalecha Nirop Ghetana Nibandh in Marathi
Shalecha Nirop Ghetana Nibandh in Marathi

Essay on School Farewell in Marathi: शालान्त पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी आमच्या शाळेने निरोप समारंभ आयोजित केला होता. समारंभासाठी सायंकाळी बरोबर पाच वाजता मी शाळेत गेलो. शाळा आज मला वेगळीच भासत होती. प्रवेशद्वारापुढे शोभिवंत रांगोळी रेखाटली होती आणि सारे शिक्षक आम्हां विदयार्थ्यांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यांच्या या स्वागतानेच आम्ही सारे भारावून गेलो. सभागृह आज नव्या नवलाईने नटलेले दिसत होते. आजवर ज्यांनी शाळेस उत्कृष्ट यश मिळवून दिले, अशा गुणवंत विदयार्थ्यांची छायाचित्रे सभोवताली स्टँडवर लावून ठेवलेली होती. केवढी कल्पकता होती त्यात ! या साऱ्या प्रतिमा आम्हांला जणू होत्या. तुम्हांलाही असेच यश मिळवायचे आहे, शाळेचा लौकिक वाढवायचा आहे – असेच जणू त्या आम्हांला प्रेरणा देत सुचवत होत्या, जागोजागी निशिगंधाच्या व गुलाबाच्या फुलांची आरास केल्यामुळे सारे वातावरण सुगंधित झाले होते.

ठरल्या वेळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. आमचे जिल्हाधिकारी निरोप समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. मुख्याध्यापकांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तेव्हा एक सुखद धक्का बसला. कारण जिल्हाधिकारी आमच्याच शाळेचे माजी विद्यार्थी होते व त्यांचे नाव शाळेच्या सन्माननीय विदयार्थ्यांच्या यादीत झळकत होते !

निरोप समारंभाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या समारंभात भाषणांची आतषबाजी हती. आमच्या बॅचने गेल्या दहा वर्षांत मिळवलेल्या यशाचा आढावा मुख्याध्यापकांनी मोजक्या शब्दांत घेतला. पाहुण्यांनीही अगदी मोजक्या शब्दांत आपल्या जीवनातील यशाचे प्रेय शाळेकडे कसे जाते, हे विनम्रपणे सांगितले. विदयार्थी आणि शिक्षक यांच्याकडून एकमताने निवड झालेल्या आदर्श विदयार्थ्यांचा पाहुण्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर विदयार्थ्यांना भाषण करण्यास पाचारण करण्यात आले. पण नेहमी वक्तृत्वस्पर्धा गाजवणारे सारे फर्डे वक्ते आज भारावले होते. त्यांच्या कंठांतून शब्दच फुटत नव्हते. सारेच वातावरण गंभीर झाले होते. सगळ्यांच्याच डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. हा वातावरणातील उदास गंभीरपणा निवळावा, म्हणून काही गमतीदार खेळ सुरू करण्यात आले व नंतर अल्पोपाहाराच्या कार्यक्रमाने समारंभाची सांगता झाली.

समारंभ संपला तरी आमचे पाय शाळेतून निघत नव्हते. या वास्तूशी आमच्या शालेयजीवनातील अनेक स्मृती निगडित झालेल्या होत्या. त्या स्मृतींना उजाळा देत गुरुजनांचा आणि मित्रांचा निरोप घेऊन मी शाळेबाहेर पाऊल टाकले. क्षणैक मागे वळून पाहिले. डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रृंमुळे शाळेचा सारा परिसर अंधुक दिसत होता. शालेय जीवनातील ते ‘सुंदर दिन हरपले !’ या विचाराने ऊर दाटून आला होता.

Leave a Comment