Essay on Shivaji Maharaj in Marathi: ‘शिवाजीला कैद करावे किंवा जमल्यास ठार मारावे.’ असा आदेश घेऊनच अफजलखान हा विजापूरहून निघाला होता. शिवाजीराजांनी हा सर्व कावा ओळखला होता; म्हणून त्यांनी प्रतापगडासारख्या दुर्गम स्थळी आपला मुक्काम ठेवला होता.
अफजलखानाने श्रीशिवाजीराजांना एक खलिता पाठवला आणि शरण येण्याची आज्ञा केली. राजे खानाची शक्ती व त्याच्यामागे असलेले आदिलशाहाचे सामर्थ्य ओळखून होते. येथे शक्तीपेक्षा युक्तीच जास्त उपयोगी पडेल हे महाराजांनी ओळखले होते. त्यांनी खानाला प्रतापगडाकडे आणण्यासाठी मोठ्या मुत्सद्दीपणाने त्याला कळवले, “आपण प्रतापगडास यावे आणि माझा पाहुणचार स्वीकारावा. मी माझी सर्व शस्त्रे, माझा खंजीरसुद्धा आपल्यापाशी ठेवून देईन.” महाराजांचा हा डावपेच अफजलखानाला कळला नाही. युद्धावाचून आपल्या हातात येणार, अशी अफजलखानाची समजूत झाली होती.
महाराजांनी सैन्याची मोठी तयारी केली. त्यांनी आपले घोडदळ अधिकारी नेताजी पालकर आणि पायदळ अधिकारी मोरोपंत पिंगळे यांना जय्यत तयारीनिशी बोलावून घेतले. प्रतापगडाच्या आसमंतात मराठ्यांची पथके ठिकठिकाणी मोक्यावर ठेवली. शिवाजी त्याचप्रमाणे वाईहून प्रतापगडाकडे येण्यास निघालेल्या अफजलखानाची व त्याच्या सैन्याची खूप बडदास्त ठेवली.
प्रतापगडाजवळ दोघांच्या भेटीसाठी शामियाने उभारले गेले. दोघांनीही बरोबर मोजके शरीररक्षक आणावेत व त्यांना शामियान्याच्या बाहेर ठेवावेत; तसेच, प्रत्यक्ष शामियान्यात दोघांचे वकील व दोन रक्षकच असावेत, असा करार झाला. समजा, भेट अयशस्वी झाली तर पुढे काय करायचे, याच्या सूचनाही राजांनी भेटीपूर्वीच देऊन ठेवल्या होत्या.
१० नोव्हेंबर १६५९ हा दिवस भेटीसाठी नक्की केला गेला. महाराजांच्या शरीररक्षकांत गायकवाड, सिद्दी इब्राहीम, जिवाजी महाले ही मंडळी होती; तर अफजलखानाच्या शरीररक्षकांत सय्यद बंडा, शंकराजी मोहिते, पिलाजी मोहिते होते. पंताजी गोपीनाथ हे महाराजांचे वकील होते; तर कृष्णाजी भास्कर हे खानाचे वकील होते.
अफजलखान व राजे हे एकमेकांना भेटण्यासाठी शामियान्यात आले, तेव्हा खानाने शिवाजी महाराजांना घट्ट आलिंगन दिले. आता शत्रू आपल्या ताब्यात आला आहे, असे खानाला वाटले. त्याने राजांना घट्ट धरून त्यांच्या कुशीत कट्यार खुपसण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात राजांनी चपळाईने वाघनखे खानाच्या पोटात खुपसली आणि त्यांच्या मिठीतून सुटका करून घेतली, कट्यारीने खानावर वार केला. अफजलखान मारला गेला.
राजांच्या शरीररक्षकांनी खानाच्या शरीररक्षकांनाही जायबंदी केले. सैन्याला इशारा मिळाल्यावर सैन्याने अफजलखानाच्या बेसावध सैन्यावर हल्ला करून त्यांचा पूर्ण बीमोड केला. महाराजांना या युद्धात शत्रूसैन्याचे हत्ती, घोडे, उंट, मूल्यवान वस्त्रे, अलंकार इत्यादी संपत्तीची मोठी प्राप्ती झाली. या प्रसंगातून महाराजांचे धैर्य, सावधानता आणि धाडस हे गुण दिसून आले. या साऱ्या प्रसंगावरून महाराज आपल्या रणनीतीत किती वाकबगार होते, हे लक्षात येते.